दिनांक –२७/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मंत्रालयातील देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची एका अज्ञात महिलेकडून तोडफोड करण्यात आली. यावेळी तिने कार्यालयात तोडफोड करून एकच गोंधळ घातला. दरम्यान ही महिला कोण होती? याबद्दल आता तपास सुरु करण्यात आला आहे.
मुंबई येथे मंत्रालयात महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात अज्ञात महिलेकडून तोडफोड केल्याची माहिती सध्या समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सहाव्या मजल्यावर कार्यालय आहे. काल संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची अज्ञात महिलेकडून नासधूस करण्यात आली आहे. मंत्रालयातील कार्यालयात असणारी देवेंद्र फडणवीसांच्या नावाची पाटी फेकून देत अज्ञात महिलेने पोबारा केला आहे. या अज्ञात महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात घुसून एकच गोंधळ घातला आणि तोडफोडीचा प्रयत्न केला. कार्यालयाबाहेर असणाऱ्या कुंड्या देखील या अज्ञात महिलेने फेकल्यात. तोडफोड करणारी ही महिला मंत्रालयात पास न घेता शिरली असल्याची माहिती मिळत आहे. हा सगळा गोंधळ घातल्यानंतर ही अज्ञात महिला त्यानंतर तिथून पसार झाली. दरम्यान, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचेच कार्यालयच सुरक्षित नसल्याची चर्चा या घडलेल्या प्रकारामुळे सुरू झाली आहे. ही महिला कोण होती? ते समजू शकलेलं नाही. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मंत्रालय सुरक्षा विभागाकडूनही या अज्ञात महिलेचा शोध सध्या सुरू आहे.