श्रीगणेशोत्सवातील थर्मोकोलसारख्या सजावटींना पर्याय म्हणून पर्यावरणपूरक सजावटींचा अवलंब करण्याच्या `उत्सवी’ संस्थेचे प्रमुख नानासाहेब शेंडकर यांच्या २३ वर्षांच्या अथक प्रयत्नांना यश मिळत असून यंदा त्यांच्या सजावटीना महाराष्ट्र मंडळ, लंडनसह देश-विदेशातील अनेक संस्थांकडून श्री गणेशोत्सवासाठी मागणी होत आहे. `अय़ोध्या राममंदिर’ या संकल्पनेवरील ही सजावट आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली असून यंदा हे राममंदिर लंडनपर्यंत पोहचले आहे. त्याचबरोबर अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच संस्थांकडून त्यासाठी आग्रह केला जात आहे.
नानासाहेब शेंडकर यांनी पर्यावरणाची हानी थांबवण्यासाठी २००१ साली ही चळवळ सुरु केली. त्यासाठी थर्माकोल निर्मिती आणि सजावटीचा त्यांचा सुमारे १०० कामगार कार्यरत असलेला सुस्थितीतील कारखाना बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी पुठ्ठ्यांपासून दीर्घकाळ टिकेल अशा आकर्षक आणि नक्षीदार सजावटींच्या पर्याय उपलब्ध केला. या संकल्पनेचे ते जनक असून ती अल्पावधीत गणेशभक्तांमध्ये लोकप्रिय झाली. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्याबरोबर या सजावटी दीर्घकाळ टिकत असल्यामुळे आणि त्याचा पुनर्वापार करणे शक्य आहे, त्यामुळे त्यांची मागणी वाढू लागली.
पर्यावरणाच्या रक्षणाची धुरा सांभाळण्यासाठी आणि नव्या पिढीमध्ये हा संस्कार रुजवण्यासाठी नानासाहेब शेंडकर यांनी शाळाशाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत कार्यशाळांचे आयोजन केले आहे. त्यांच्या पुठ्ठ्यांच्या सजावटींची संकल्पना रुजवली आहे. त्यालादेखील उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे. गणेश गल्ली, लालबाग येथील `उत्सवी’ संस्थेतदेखील ते या विषयावर मार्गदर्शन करत असतात. शासकीय स्तरावरदेखील त्यांचा याबाबतचा पाठपुरावा सातत्याने सुरु असतो.
सध्या मुंबई आणि परिसरात सुमारे २ लाख घरगुती आणि १० हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यांच्याकडून विसर्जनानंतर जमा होणारा थर्माकोलचा ५ हजार ट्रक इतका कचरा जमा होतो. हा कचरा नदी-नाले-ओढे-विहिरी-इमारतींमधील अरुंद गल्ल्या या ठिकाणी टाकला जात असे आणि ढिगांच्या स्वरुपात वर्षानुवर्षे साचून पूर, नाले-गटारे तुंबणे अशा विविध स्वरुपातून पर्यावरणाची हानी वाढत होती. पण आता थर्माकोलसारखे अविघटनकारी पदार्थ टाकण्याची प्रक्रिया थांबली गेली आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होत असून या चळवळीला बळकटी मिळत आहे आणि श्रीगणेशाचे पावित्र्य राखले जात आहे, अधिकाधिक गणेशभक्तांनी तसेच मंडळांनी याचा अवलंब करावा, असे आवाहन नानासाहेब शेंडकर यांनी यासंदर्भात बोलताना व्यक्त केले आहे.