दिनांक –१०/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्यांचा गळा दाबून खुन करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. सतीश वाघ यांचे सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मांजरी फुरसुंगी रस्त्यावरुन अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी शिंदवणे घाटात त्यांचा मृतदेह आढळून आला होता.
याबाबत पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितले की, सतीश वाघ यांचे अपहरण करण्यात आल्यानंतर त्यांना शिंदवणे घाटात आणल्याचे दिसून येते. तेथे त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर त्यांचा गळा दाबून हत्या केल्याचे दिसून आले. शिंदवणे घाटात सायंकाळी गेलेल्या लोकांना हा मृतदेह दिसला. त्यांनी उरुळी कांचन पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुणे पोलिसांना याची माहिती मिळाली. सतीश वाघ यांचे शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. हत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. वेगवेगळे अँगलमधून पोलीस तपास करीत आहेत.
याबाबत त्यांचा मुलगा ओंकार सतीश वाघ (वय २७, रा. फुरसुंगी फाटा, मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सतीश वाघ यांचे मांजरी -फुरसुंगी रोडवर ब्ल्युबेरी नावाचे हॉटेल आहे. ते भाडेतत्वावर चालविण्यास दिले आहे. सोलापूर रोडवरील काही दुकाने भाडेतत्वावर दिलेली आहेत. ते त्यांचा पारंपारिक शेती व्यवसाय सांभाळत होते.
सतीश वाघ यांचे अपहरण शेवरलेट एन्जॉय या कारमधून करण्यात आले. ही कार काही ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये दिसून आली. परंतु, तिचा नंबर दिसत नव्हता. त्यामुळे पुणे पोलिसांनी पुणे शहरात रजिस्टर असलेल्या सुमारे ५० शेवरलेट एन्जॉय कार मालकांची चौकशी केली. परंतु, अपहरण केलेल्या कारचा शोध लागू शकला नाही.