दिनांक –१३/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसीतील निकाकेम कंपनीतून गुरुवारी रात्रीच्या सुमारास गॅस गळती झाली. यामुळे संपूर्ण अंबरनाथ शहरात रासायनिक धूर पसरला होता. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीत धाव घेत पाहणी केली असता एमआयडीसीतील कोणत्याही कंपनीतून गॅस सोडण्यात आला नाही, असं सांगण्यात आलं. शहरात मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने अनेक नागरिकांना त्रास झाल्याची माहिती आहे. मात्र, हा धूर कसा पसरला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मात्र, शहरात पसरलेल्या धुरामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, निकाकेम केमिकल कंपनीतून केमिकल हवेत पसरल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. बऱ्याच जणांना घशात खवखव आणि डोळ्यात जळजळ असा त्रास झाला.
वायू प्रदूषण मंडळाच्या मोबाईल व्हॅनकडून सध्या हवेची तपासणी सुरु आहे. नेमका वायू कोणता आहे याची तपासणी करण्याचे काम सुरु आहे. तसेच परिस्थिती आटोक्यात आली असून घाबरून जाण्याची गरज नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.