दिनांक – १२/०१/२०२६,सातारा प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेला एक जवान आपल्या पहिल्या अपत्याच्या स्वागतासाठी सुट्टीवर गावी आला होता. घरात नव्या पाहुण्याच्या आगमनाची लगबग सुरू असतानाच काळाने घाला घातला आणि एका भीषण अपघातात या जवानाचा दुर्दैवी अंत झाला. प्रमोद परशुराम जाधव (रा. दरे, ता. सातारा) असे या शहीद जवानाचे नाव आहे. मनाला चटका लावणारी घटना म्हणजे, प्रमोद यांच्या निधनानंतर अवघ्या काही तासांतच त्यांच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. जन्मानंतर अवघ्या ८ तासांच्या या चिमुकलीला पित्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी स्मशानभूमीत आणावे लागले, हे दृश्य पाहून उपस्थितांचे काळीज पिळवटून निघाले.
सातारा तालुक्यातील दरे गावचे सुपुत्र प्रमोद जाधव हे भारतीय लष्करात सिकंदराबाद (श्रीनगर) येथे कर्तव्य बजावत होते. पत्नीच्या प्रसूतीसाठी (डिलिव्हरी) ते ८ दिवसांपूर्वीच सुट्टीवर गावी आले होते. शनिवारी काही कामानिमित्त ते आपल्या दुचाकीवरून साताऱ्यातील वाढे फाटा येथे जात होते. त्याचवेळी पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ एका आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात प्रमोद जाधव यांचा जागीच मृत्यू झाला.
एकीकडे जन्माचा आनंद, दुसरीकडे मृत्यूचा शोक प्रमोद यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच दरे गावावर शोककळा पसरली. दुर्दैवाची बाब म्हणजे, ज्या दिवशी प्रमोद यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी गावी आणण्यात आले, त्याच वेळी त्यांच्या गर्भवती पत्नीने साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात मुलीला जन्म दिला. घरात एकाच वेळी पाळणा हलणार होता आणि दुसरीकडे कर्त्या पुरुषाची तिरडी उचलली जाणार होती. या घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा हादरून गेला आहे.
हृदयद्रावक अंत्यदर्शन रविवारी सकाळी प्रमोद जाधव यांच्यावर दरे या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी एक अत्यंत भावूक प्रसंग घडला. प्रमोद यांच्या पत्नीला आणि नुकत्याच जन्मलेल्या त्यांच्या लेकीला रुग्णवाहिकेतून अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले. स्ट्रेचरवर असलेल्या पत्नीने आणि त्या ८ तासांच्या तान्ह्या लेकीने प्रमोद यांना अखेरचा निरोप दिला. हे दृश्य पाहून अंत्यविधीसाठी जमलेल्या हजारो ग्रामस्थांना आणि जवानांना अश्रू अनावर झाले होते.
प्रमोद जाधव यांच्या पश्चात पत्नी, वडील आणि नवजात कन्या असा परिवार आहे. त्यांच्या आईचे यापूर्वीच निधन झाले आहे. देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या वीर जवानाच्या अशा अचानक जाण्याने आणि जाधव कुटुंबावर कोसळलेल्या या दुखाच्या डोंगरमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

