दिनांक – ०६/०१/२०२६,बुलढाणा प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मेहकर तालुक्यालगत असलेल्या समृद्धी महामार्गावर मंगळवार दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास एक मोठा अपघात घडण्याची शक्यता असतानाच वेळीच सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. मुंबई कॉरिडोरवरील चॅनल क्रमांक ३००.१ येथे नागपूरहून नाशिककडे जाणाऱ्या एका ट्रॅव्हल वाहनाला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही.
प्राप्त माहितीनुसार, मलकापूर पोलीस केंद्र अंतर्गत समृद्धी महामार्ग उपकेंद्र दुसरबीड येथे रात्रगस्त पेट्रोलिंग सुरू असताना CRO संभाजीनगर यांनी दूरध्वनीद्वारे माहिती दिली की चॅनल क्रमांक ३००.१ (मुंबई कॉरिडोर) येथे एका ट्रॅव्हलला आग लागलेली आहे. ही माहिती मिळताच API संदीप इंगळे, HC ९९८, HC १२१४, PC १९१४, PC ५२३ तसेच एम.एस.एफ.चे दोन जवान तातडीने घटनास्थळी रवाना झाले.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर ट्रॅव्हल क्रमांक MH 40 CT 8043 (खुराणा ट्रॅव्हल) ही रस्त्याच्या कडेला जळत असल्याचे दिसून आले. सदर ट्रॅव्हलचे चालक वाहिद शेख (वय ३६, रा. नागपूर) यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की ट्रॅव्हलच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागली. सदर ट्रॅव्हल नागपूर येथून नाशिककडे जात होती. वाहनामध्ये एकूण ३६ प्रवासी प्रवास करत होते.
आग लागल्याची बाब लक्षात येताच चालक व कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना तात्काळ सुरक्षितरित्या बाहेर काढले. कोणालाही कोणतीही दुखापत झाली नाही. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे वाहन बोलावून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
अपघातानंतर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना सरकारी वाहन MH 28 C 6367 द्वारे दुसरबीड टोलनाक्यावर सुरक्षितरीत्या सोडण्यात आले. अपघातग्रस्त ट्रॅव्हल रस्त्याच्या बाजूला हलवण्यात आल्याने समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होती.
ही घटना मेहकरजवळील शिवणी पिसा गावालगत समृद्धी महामार्गावर घडली असून, वेळेवर मदतकार्य व पोलीस प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

