दिनांक – १४/०१/२०२६,मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणूक २०२६ साठी अवघे काही तास उरले असताना, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानापूर्वी प्रचाराच्या तोफा थंडावत असतानाच, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची एक सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. तेजस्विनीने मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आणि भ्रष्ट उमेदवारांना नाकारण्याचे आवाहन केले आहे.

नेमकं काय म्हणाली तेजस्विनी? तेजस्विनी पंडितने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘marathi.com’ या पेजचा एक व्हिडिओ रि-शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने मतदारांना उद्देशून लिहिले आहे की, “आपल्या रोजच्या जीवनात नगरसेवक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच भ्रष्ट माणसांच्या हातात पालिका देऊ नका. सतर्क रहा. योग्य, सुज्ञ आणि सुशिक्षित उमेदवारांनाच निवडून द्या.”

नेहमीच आपल्या रोखठोक मतांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तेजस्विनीने या पोस्टद्वारे मुंबईच्या विकासासाठी योग्य लोकप्रतिनिधी निवडण्याची गरज अधोरेखित केली आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून तिला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
तारकांचा प्रचारात सहभाग आणि राजकीय समीकरणे एकीकडे तेजस्विनीने सामाजिक भान जपत मतदारांना जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे, तर दुसरीकडे अनेक बॉलिवूड आणि मराठी कलाकार प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रचार करताना दिसत आहेत. रवीना टंडन, गोविंदा आणि आदेश बांदेकर यांसारख्या कलाकारांनी विविध पक्षांसाठी रोड शो आणि प्रचारसभा घेतल्याचे पाहायला मिळाले.

२०२६ च्या या निवडणुकीत राजकीय समीकरणेही बदलली आहेत. तब्बल २० वर्षांनंतर उद्धव ठाकरे (ठाकरे गट) आणि राज ठाकरे (मनसे) यांची युती झाली असून, हे दोन भाऊ मिळून भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला आव्हान देत आहेत. मुंबईतील २२७ जागांसाठी ही लढत अटीतटीची होणार आहे. ठाकरे बंधूंची युती ९७ जागांवर भाजपला (१३७ जागा) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (९० जागा) थेट टक्कर देणार आहे. काँग्रेस १४३ जागांवर नशीब आजमावत आहे, तर वंचित बहुजन आघाडीने ६२ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
तेजस्विनी आणि तिची राजकीय भूमिका तेजस्विनी पंडित केवळ पडद्यावरच नाही, तर सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवरही सक्रिय असते. यापूर्वीही तिने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल अनेकदा आदर व्यक्त करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. आता निवडणुकीच्या तोंडावर तिने केलेले हे आवाहन पुन्हा एकदा तिची सामाजिक सजगता दर्शवते.

Share.