दिनांक – १६/०१/२०२६,बुलढाणाप्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- बुलढाणा शहरातील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या १७ वर्षीय तरुणीचा गुरुवारी (दि. १५) सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. सेजल बुरकुल असे मृत तरुणीचे नाव असून, तिच्या मृत्यूने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी डॉक्टरांवर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत रुग्णालयात काही काळ गोंधळ घातला. मात्र, डॉक्टरांनी हे आरोप फेटाळून लावत मुलीची प्रकृती आधीच नाजूक असल्याचे स्पष्ट केले.

नेमकी घटना काय? प्राप्त माहितीनुसार, सेजल बुरकुल ही गेल्या काही काळापासून मेंदूच्या विकाराने त्रस्त होती. बुधवारी (दि. १४) रात्री अचानक तिची प्रकृती बिघडली आणि ती बेशुद्ध पडली. नातेवाईकांनी तिला तातडीने बुलढाण्यातील ‘न्यूरॉन हॉस्पिटल’मध्ये दाखल केले. रुग्णालयात दाखल करतेवेळी ती बेशुद्ध अवस्थेत होती. रात्रभर डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले, परंतु गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.

नातेवाईकांचा आरोप आणि गोंधळ सेजलच्या मृत्यूनंतर तिच्या आईसह उपस्थित नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. डॉक्टरांनी वेळेवर आणि योग्य उपचार न केल्यानेच सेजलचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला. यामुळे काही काळ रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

डॉक्टरांचे स्पष्टीकरण न्यूरॉन हॉस्पिटलचे डॉ. निलेश वाघ यांनी नातेवाईकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सेजलला काही महिन्यांपूर्वी मेंदूचा कर्करोग (Brain Cancer) असल्याचे निदान झाले होते. तिच्यावर मुंबईत शस्त्रक्रिया देखील झाली होती. बुधवारी रात्री जेव्हा तिला रुग्णालयात आणले गेले, तेव्हा ती बेशुद्ध होती आणि तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. आम्ही तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु दुर्दैवाने तिचा जीव वाचू शकला नाही.”

डॉ. वाघ यांनी पुढे सांगितले की, गुरुवारी सकाळी सेजलचे ब्लड प्रेशर अचानक वाढले आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. दरम्यान, मुलीच्या आजाराची आणि उपचारांची पूर्वकल्पना असलेल्या इतर नातेवाईकांनी मध्यस्थी केल्यानंतर तणाव निवळला आणि कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला.
हळहळ व्यक्त सेजल ही अत्यंत हुशार मुलगी होती असे सांगितले जात आहे. तिच्या अशा अचानक जाण्याने बुलढाणा शहरात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share.