दिनांक –१६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-सी एन जी पंपावर गॅस भरत असताना त्याच्या गॅसचे नोझल उडून ते कामगाराच्या डाव्या डोळ्यावर जोरात लागले. हा फटका इतका जबरदस्त होता की, त्यामुळे कामगाराला आपला डावा डोळा कायमचा गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याबाबत हर्षद गणेश गेहलोत (वय २३, रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मालक व मॅनेजर धैर्यशील पानसरे व राहीत हरकुर्की यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार धनकवडीतील तीन हत्ती चौकातील एस स्क्वेअर सी एन जी पेट्रोल पंपावर रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडीतील तीन हत्ती चौकात एस स्क्वेअर हा सी एन जी पंप आहे. तेथे हर्षद गेहलोत हे गेल्या एक वर्षापासून काम करत आहेत. ते गाडीमध्ये सीएनजी गॅस भरत असताना गॅसचे नोझल उडून त्यांच्या डाव्या डोळ्याला जोरात लागल्याने ते जखमी झाले. एस स्क्वेअर सी एन जी पंपाचे मालक व मॅनेजर धैर्यशील पानसरे व राहीत हरकुर्की यांनी हर्षद गेहलोत यांना कामाला ठेवून घेतले. त्यांच्या जीवीताच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाय योजना केली नाही. त्यामुळे त्यांना त्यांचा डावा डोळा कायमचा गमवावा लागला़ पोलीस हवालदार चव्हाण तपास करीत आहेत.