दिनांक –१४/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- सर्वोत्तम तंत्रज्ञानाने सज्ज असा हा महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प (Cyber Security Project) जनतेमधील सायबर हल्ल्याची भीती निश्चितच कमी करेल. हा प्रकल्प जनतेचे डिजिटल माध्यमातून होणाऱ्या फसवणूकीचे प्रमाण कमी करण्यात, त्यांना दिलासा देण्यात नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
नवी मुंबईतील महापे औद्योगिक वसाहत येथील मिलेनियम बिझनेस पार्क येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार रमेश पाटील, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इक्बालसिंह चहल, अपर पोलीस महानिरीक्षक अर्चना त्यागी, विशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर), श्री.यशस्वी यादव, पोलीस महानिरीक्षक (आर्थिक गुन्हे) बिपिन कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, पोलीस उपमहानिरीक्षक, सायबर श्री संजय शिंत्रे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पी. वेलरासू, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, गृह विभागाचे सहसचिव राहुल कुलकर्णी, वास्तूरचनाकार सलोनी देवधर, सपना कोळी, सायबर सुरक्षा प्रकल्पाचे व्यवस्थापक ननवनाथ देवगुडे आदी उपस्थित होते.
सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट हा सर्वांचा ड्रीम प्रोजेक्ट तसेच राज्यासाठी एक आयकॉनिक प्रोजेक्ट आहे. अपेक्षेपेक्षा अधिक चांगल्याप्रकारे हा प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, सर्व जगात डिजिटायजेशन झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर या क्षेत्रातील आव्हानेही तितक्याच प्रमाणात वाढत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे महत्त्व, सायबर विंगचेही महत्त्व आता वाढू लागले आहे. डिजिटल युगातील सायबर अटॅकचा सामना करण्यासाठी आपण सुसज्ज व्हावे, ही काळाची गरज होती. ही गरज या सेंटरच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे.
नव्याने निर्माण झालेल्या महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्टबद्दल श्री. फडणवीस म्हणाले, हे सेंटर देशातील सर्वात आधुनिक सायबर सिक्युरिटी सेंटर झाले आहे. व्हाट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून खोट्या मेसेजच्या आधारे लोकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर शासनाने गांभीर्याने विचार करून आधुनिक सायबर सिक्युरिटी सेंटर सुरू करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
उपमुख्यमंत्री म्हणाले की, या सायबर सिक्युरिटी सेंटरच्या माध्यमातून दरवर्षी पाच हजार पोलिसांना प्रशिक्षण दिले जाऊ शकते. महाराष्ट्र हे भारतातील तंत्रज्ञान क्षेत्राचे नेतृत्व करीत आहे. हा केवळ प्रकल्प न राहता कॉर्पोरेशन व्हावे, इतर राज्यांनाही या माध्यमातून सायबर सिक्युरिटी बाबतचे मार्गदर्शन केले जावे, खासगी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान तज्ज्ञांशीही आपला समन्वय वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी या माध्यमातून जनतेला सायबर सिक्युरिटी उत्तम प्रकारे देण्यात आपण यशस्वी होऊ, असा विश्वास व्यक्त केला.
14407 हा हेल्पलाईन नंबर आजपासून कार्यान्वित होणार असून 15 ऑक्टोबर पासून या केंद्रातील सर्व सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाच्या संकेतस्थळाचेही उद्घाटन उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी या सायबर सिक्युरिटी प्रकल्पामध्ये महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर), श्री.यशस्वी यादव आणि कौस्तुभ धवसे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्री.कौस्तुभ धवसे यांनी केले.