दिनांक –२४/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- देशात साजरा केला जाणारा प्रत्येक सण समाजाला एकत्र आणण्याचे काम करतो. ओणम हा प्राचीन सण साजरा करताना केरळीय समाजामार्फत सांस्कृतिक वारसा जपला जातो, ही उत्साहवर्धक बाब असून सर्वांनी आजही समर्पक असणाऱ्या एकता, करुणा आणि सेवा या मूल्यांचे पालन करावे, असे आवाहन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.
बॉम्बे केरळीय समाजाच्या वतीने आज मुंबईत ओणम उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाजासाठी योगदान देणाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ‘विशाल केरलम’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बॉम्बे केरळीय समाजाचे अध्यक्ष डॉ. एस. राजशेखरन, मानद सचिव विनोदकुमार नायर, उपाध्यक्ष प्रदीपकुमार यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, बॉम्बे केरळीय समाजाने सातत्याने नवोदितांना पाठिंबा दिला आहे, केरळच्या समृद्ध संस्कृतीला चालना दिली आहे. आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण आदी क्षेत्रांत अमूल्य सेवा दिली आहे, हे कौतुकास्पद आहे. बॉम्बे केरळीय समाजाचा मागील आठ दशकांचा उल्लेखनीय प्रवास, समाजाच्या समर्पण आणि लवचिकतेचा पुरावा असून मुंबईच्या विकासात समाजाचे मौलिक योगदान आहे. समाजात कुणी लहान किंवा मोठा नसतो, हा संदेश देऊन आपण कुठेही राहिलो तरीही आपले मूळ विसरू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ओणमच्या शुभेच्छा देऊन समाजाची अशीच भरभराट होत राहो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
प्रारंभी अध्यक्ष डॉ. राजशेखरन आणि श्री.नायर यांनी समाजाच्या कार्याची माहिती दिली