दिनांक –०६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यामुळेच चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी हल्ला करणार्या दोघांना अटक केल्यानंतर हल्लामागील कारण स्पष्ट झाले.
रेवण तानाजी लगस (वय २०, रा. गोकुळनगर, कात्रज), प्राणजित अच्युत शिंदे (वय २४, रा. हांडेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चंद्रकांत टिंगरे यांच्या पत्नी माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. माजी नगरसेविका रेखा टिंगरे व चंद्रकांत टिंगरे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरु झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला होता. त्यांनी बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा जाहीर केला होता.
चंद्रकांत टिंगरे व त्यांचे चालक हे १९ नोव्हेंबर रोजी धानोरी येथील महावितरण कार्यालयासमोर आले होते. चंद्रकांत टिंगरे हे गाडीतून खाली उतरले असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी गाडीवर दगडफेक केली होती. त्यात चंद्रकांत टिंगरे हे जखमी झाले होते. महायुतीचे उमेदवार आणि आमदार सुनिल टिंगरे यांच्या सांगण्यावरुनच त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पतीवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप रेखा टिंगरे यांनी केला होता.
याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांनी सांगितले की, हल्ला करणार्या दोघांना अटक करण्यात आली आहे. विधानसीा निवडणुकीत दुसर्या पक्षात प्रवेश केल्याचा राग मनात धरुन दगडफेक केल्याचे आरोपीच्या चौकशीत समोर आले आहे.
Share.