दिनांक –०७/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- ५१ वी राज्यस्तरीय कॅडेट आणि ज्युनियर स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कॅडेट गटाच्या सामन्यांमध्ये बहारदार खेळी करत क्रीडा प्रबोधिनीच्या स्वराज लाड, साक्षी कांबळे, ठाण्याच्या तेजस चव्हाण, संभाजीनगरच्या संस्कार मुसळे, कोल्हापूरच्या पृथ्वीराज चव्हाण आणि मुंबईच्या विहान कोटीयान यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवत सुवर्ण पदक पटकावले. मुलींच्या गटात यवतमाळची स्नेहल ढोरे आणि क्रीडा प्रबोधिनीच्या साक्षी कांबळे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याला हरवले.
शिओ तोशी या डावाने पीजेएच्या वृंदा शेलार हिला यवतमाळची स्नेहल ढोरे हिने आस्मान दाखवले तर क्रीडा प्रबोधिनीच्या साक्षी कांबळे हिने योको गाके डावाचा योग्य वेळेत परिणामकारक वापर करून संभाजीनगरच्या श्रुतकिर्ती खलाटे हिला अंतिम चरणात हरवले. सातार्याच्या वेदांत पवारला क्रीडा प्रबोधिनीच्या स्वराज लाड याने उशिरो गोशी या डावाने इप्पोन हा गुण घेऊन स्पर्धा संपवली. इप्पोन या पूर्ण गुणाने पराजित करणे हे उत्तम कौशल्याचे लक्षण ज्यूदो खेळात मानले जात असून दर्शन गवले या क्रीडा प्रबोधिनीच्या 55 किलोखालील खेळाडूस कोल्हापूरच्या पृथ्वीराज चव्हाण याने आणि मुंबईच्या विहान कोटीयान याने संभाजीनगरच्या ऋषिकेश पुंडला ओ-सोटो-गारी या पायाने आक्रमण करण्याच्या तंत्राने इप्पोन गुण घेतला.
दरम्यान सकाळच्या सत्रात स्पर्धेचे उद्घाटन डेरवण विधानसभा मतदार संघातील चार वेळा आमदार राहिलेले आणि पूर्वाश्रमीचे जुनेजाणते ज्यूदो खेळाडू डॉ विनय नातू यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गुहागर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मनोज बावदनकर, वरिष्ठ पत्रकार गणेश धनावडे, संकेत गोयथळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मल्लखांबपटू शांताराम जोशी, एस व्ही जे सी टी संस्थेचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर आणि पुना ज्यूदो असोसिएशनचे प्रतिनिधी अनिल संकपाळ उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ नातू म्हणाले की, ग्रामीण भागातून पुण्यासारख्या शहरात आल्यानंतर माझ्या व्यक्तिमत्व विकासात ज्यूदोचा खूप मोठा वाटा आहे. भावाने दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी ज्यूदो खेळाकडे वळलो आणि त्यामुळे जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन अधिकच दृढ झाला. या खेळासाठी आणि खेळाडूंच्या प्रगतीसाठी मी नेहमीच तत्पर राहीन असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले.
संघटनेचे महासचिव शैलेश टिळकांनी स्पर्धांच्या 50 वर्षांचा आढावा घेताना सांगितले की, काथ्याच्या गाद्यांवरील खेळापासून आणि खेळाडूंच्या निवासासाठी अंथरलेल्या संतरंजीपासून ते आज खेळाडूंच्या कौशल्यवृद्धीसाठी अत्याधुनिक साहित्यांची उपलब्धता आणि आरामदायक व्यवस्था पुरवण्याच्या प्रयत्नात विश्वस्त कायम प्रयत्नशील राहिले आहेत. आज यासाठी पुनीत बालन यांसारखे उद्योजक पुढे येवून ज्यूदो खेळाच्या उत्थापनेसाठी पुढे आले आहेत. त्यामुळे याचा दृश्य परिणाम राज्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवताना दिसत आहेत. ५० वी सुवर्ण महोत्सवी स्पर्धा आयोजनाबाबत ज्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न आम्ही केला त्याचप्रमाणे यापुढेही खेळाडूंच्या सोयीसुविधांसाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे टिळक म्हणाले.
राज्य संघटनेचे अध्यक्ष अँड. धनंजय भोंसले म्हणाले की आपला विद्यार्थी आपल्या समोर प्रमुख पाहुणे म्हणून बघण्याचे सुदैव आज मला लाभले आहे. विद्यार्थीदशेत खेळाची कौशल्य शिकलेले डॉ नातू यांचा आज सत्कार करताना गौरव वाटत असल्याची भावना भोंसले यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन रत्नागिरी ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष निलेश गोयथळे यांनी केले.