दिनांक –०६/१२/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज :- महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत· ५३ वर्षीय महिला रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील अतिविशेषोपचार रुग्णालयातील हृदयरोगशास्त्र विभागात अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी सेवा सुरु करण्यात आली आहे. ०५ डिसेंबर २०२४ रोजी एका ५३ वर्षीय महिला रुग्णांवर हृदयरोगशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. संतोष कवठाळे यांनी या संस्थेच्या अतिविशेषोपचार रुग्णालयातील पहिली अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी (दोन स्टेन्ट बसवून) यशस्वीरित्या पूर्ण केली.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय एस. मोहिते व अतिविशेषोपचार रुगणालयाचे विशेषकार्य अधिकारी डॉ. सुनिल होळीकर यांनी मागील एक वर्षापासून लातूर अतिविशेषोपचार रुगणालय येथे हृदयरोगशास्त्र विभागाचे कॅथलॅब सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. डॉ. मेघराज चावडा यांनी महात्मा ज्योतीबा फुले योजनेअंतर्गत मान्यता घेवून मोफत दोन स्टेन्टची पूर्तता केली. त्यामुळे या रुग्णांवर मोफत अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी करण्यात आली.
विलासराव देशमुख अतिविशेषोपचार रुग्णालयामध्ये अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी ही सुविधा महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे लातूर जिल्हा व परिसरातील गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. मोहिते यांनी केले.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन जाधव, भूलतज्ज्ञ विभागप्रमुख डॉ. शैलेश चव्हाण, औषधवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. निलिमा देशपांडे, डॉ. सुमित वाघमारे, डॉ. चंद्रशेखर गौरे, हदयरोगतज्ज्ञ डॉ. संगिता आगळे, डॉ. हाके, भुलतज्ज्ञ, अधिसेविका लक्ष्मी आपटे, अमृता पोहरे, वरिष्ठ लिपीक बाबासाहेब काटे व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.