दिनांक –०3/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- वांद्रे उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महापालिका उद्यानात उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे मंगळवारी रात्री सर्वपक्षीय मान्यवरांकडून मोठ्या जल्लोषात अनावरण करण्यात आले. खार,वांद्रे आणि सांताक्रूझ येथील आंबेडकरी जनतेने बाबासाहेबांच्या येथील पुतळ्याची मागणी करीत गेली २४ वर्ष संघर्ष केला होता.

वांद्रयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून या पुतळ्याची उभारणी करण्यात आली. त्याचे अनावरण केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री, रिपब्लिक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते, आमदार अनिल परब, स्थानिक आमदार झिशान सिद्धीकी, बाबा सिद्धीकी, माजी आमदार तृप्ती बाळा सावंत, शशिप्रभू, सचिन सावंत, वरुण सरदेसाई, शिंदे शिवसेनेचे विभागप्रमुख कृणाल सरमळकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण तांबे, सचिव सुदेश शिर्के, सुमित वजाळे, चंद्रशेखर सकपाळ, किसन रोकडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

– पुतळ्यासाठी २४ वर्ष संघर्ष ! ( बॉक्स )
वांद्रे उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालिका उद्यानात गेली ४० वर्ष महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला भव्य कँडल मार्च काढून रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सामूहिक मानवंदना वाहिली जाते. त्यासाठी उद्यानात भव्य पुतळा असावा, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली होती. दिवंगत शिवसेना आमदार बाळा सावंत आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पुतळ्यासाठी विशेष हातभार लावला. तसेच प्रतिष्ठानच्या कार्यकारिणीने गेली २४ वर्ष पाठपुरावा करून अखेर आंबेडकरी जनतेची मागणी पूर्ण केली.

– पंचधातूंचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा ! ( बॉक्स )
सुप्रसिद्ध मूर्तिकार स्वप्नील कदम यांनी हा पुतळा साकारला आहे. साडे तेरा फूट उंच आणि पंचधातूने हा पुतळा साकारण्यात आला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा दिशादर्शक बाबासाहेबांचा पुतळा पाहण्यासाठी आंबेडकरी जनतेने येथे गर्दी केली आहे.

Share.