दिनांक – ०६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीच्या “मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष” लोकार्पण सोहळ्यात केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून भारतरत्न गानसम्राज्ञी मंगेशकर नाटयगृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी आमदार प्रताप सरनाईक, मिरा-भाईंदर-वसई -विरार शहर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, शहर अभियंता दीपक खांबित, उपायुक्त कल्पिता पिंपळे, उपायुक्त डॉ. सचिन बांगर, उपायुक्त (मुख्यालय) संजय दोंदे, महापालिका अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांना आपण सुरक्षित आहोत असे वाटणे गरजे आहे. कोणत्याही प्रकारची भिती मनात वाटू नये. सी.सी.टीव्ही लाईव्ह फुटेज पाहता येणार आहे. यामुळे चुकीच्या प्रकाराला आळा बसणार आहे. विद्यार्थ्याची सुरक्षा महत्वाची आहे. शालेय शिक्षण विभागात नियम कडक करण्यात आले आहेत. सर्वांनी सावधगिरीने काम केले पाहिजे. आपले राज्य शिक्षण क्षेत्रात अन्य राज्यांच्या पुढे आहे. शालेय शिक्षणात आपल्या राज्याचे नाव अग्रेसर राहिले पाहिजे. महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाया भक्कम केला आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. शाळेमध्ये कर्मचारी नियुक्ती करताना त्यांची पार्श्वभूमी नीट तपासून घ्या. शाळांमध्ये शालेय तक्रार पेटी ठेवा. संस्था चालकांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडा. अत्याचार करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल. “शक्ती” कायदा तयार करुन मंजूरीसाठी केंद्राकडे पाठविला आहे. गुन्हेगाराला कायद्याची भीती वाटली पाहिजे. मुलींच्या सुरक्षेसाठी जे उपाय करणे गरजेचे आहेत ते करीत आहोत. आपण निर्भय-निश्चिंत राहा. सरकार तुमच्या पाठीशी आहे. आज शिक्षक दिन आहे. शिक्षक म्हणजे गुरुजन आहेत. शासनाच्यावतीने आपणाला जे लागेल ते आम्ही देवू. आपल्या शहराचे व देशाचे नाव मोठे करा. महिला पोलिसांनी शाळांमधून नियमित गस्त वाढवायला हवी.
यावेळी प्रास्ताविकात आयुक्त संजय काटकर म्हणाले की, 12 लाख लोकसंख्या असणारे मिरा-भाईंदर महानगर आहे. महानगरपालिकांच्या 36 शाळा आहेत. 10 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मिरा-भाईंदर महानगरपालिका शाळांमध्ये 200 सी.सी टीव्ही बसविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना सर्व सुविधा देण्यात येत आहे. 1 ते 10 वी पर्यंत शिक्षण मोफत आहे. फुटेजची नेहमी तपासणी करणे. चुकीचा प्रकार घडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. सी.सी.टीव्ही ” बसविण्याची नियम खाजगी शाळांना सुध्दा लागू आहे. तशा त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार व आयुक्त श्री. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कक्ष सुरू झाला असून या कक्षाद्वारे विद्यार्थांच्या विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षितेचा प्रश्न अतिशय संवेदनशीलपणे हाताळण्यासाठी उचलले महत्त्वाचे पाऊल आहे.
अत्याधुनिक सर्व्हर आणि विशेष कार्यप्रणालीयुक्त असा यु.पी.एस. जनरेटर बॅकअप असलेल्या नियंत्रण कक्षात एकाच वेळी साधारण एक हजार सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांवर नजर ठेवणारी अद्यावत यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या कक्षात संगणक, व्हीडिओ वॉल, सभाकक्ष, एक बॅकअप सर्व्हर, देखरेख ठेवण्यासाठी असलेले अधिकारी व कर्मचारी आणि प्रशस्त वातानुकूलित जागा असलेल्या या कक्षात सद्य:स्थितीत मनपा शाळा यांच्यावर लक्ष केंद्रित केले असून भविष्यात मिरा भाईंदर शहरातील सर्व खाजगी शाळेतील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे सुद्धा या उपक्रमात समाविष्ट करण्यात येतील. या नियत्रंण कक्षात कार्यरत असलेले पथक मनपा शाळेतील सीसीटीव्ही फुटेज सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तपासण्याचे व त्याचे जतन करण्याचे काम करतील. मिरा भाईंदर महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उचललेल्या या महत्त्वपूर्ण पावलामुळे भविष्यात घडणाऱ्या अनुचित घटनांवर कायमस्वरूपी आळा बसून हा विषय अतिशय संवेदनशीलपणे हाताळण्यात नक्कीच मदत होणार आहे.