दिनांक – ०६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कृषी विज्ञान संकुलास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी काष्टी ता.मालेगाव येथील कृषी विज्ञान संकुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे अशी विनंती मुख्यमंत्री श्री. शिंदे, तसेच कृषीमंत्री श्री.मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. मंत्री श्री. भुसे यांच्या विनंतीनुसार सदर कृषी विज्ञान संकुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कृषी विभागास केल्या होत्या.
त्यानुसार कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी तात्काळ निर्णय घेत काष्टी येथील ‘कृषी विज्ञान संकुलाचे नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल, काष्टी ता.मालेगाव जि.नाशिक’ असे करण्याचा निर्णय घेतला आहे. या संकुलात दरवर्षी सुमारे ३२० विद्यार्थी प्रवेश घेतात तर साधारण चार वर्षांमध्ये बाराशे पेक्षा जास्त विद्यार्थी येथे शिक्षण घेत असतात. उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, तसेच त्याचा समाजातील शेतकरी योग्य प्रचार व प्रसार व्हावा या दृष्टीने हे कृषी विज्ञान संकुल अत्यंत उपयुक्त असून आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव या कृषी विज्ञान संकुलास दिल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.