दिनांक –१९/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे (शरद गट) नेते अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी रात्री नागपूरच्या काटोल विधानसभा मतदारसंघात हल्ला झाला. अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याने अनिल देशमुख यांच्या डोक्याला दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले. अनिल देशमुख यांचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये त्याच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचे दिसत आहे. त्यांनी आपले डोके टॉवेलने बांधले आहे. या हल्ल्याचा निषेध करताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात माजी गृहमंत्र्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे राज्यात कायद्याचे राज्य आहे की गुंडांचं राज्य आहे, असा प्रश्न निर्माण होतो. अनिल देशमुख यांचा मुलगा सलील हे काटोल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी देशमुख यांनी दिवसभर परिसरात प्रचार केला. त्यांची नरखेडमध्ये सायंकाळी बैठक झाली. बैठक आटोपल्यानंतर ते कार्यकर्त्यांसह कारने काटोलकडे रवाना झाले. दरम्यान, बेला फाट्याजवळ काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

Share.