दिनांक –१८/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:-  जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात मतदानाबाबत आवश्यक तयारी झाली असून मतदानपूर्व काळात आदर्श आचासंहितेचे योग्य पालन होण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य कार्यवाही करावी. कोणत्याही प्रकारे आचारसंहिता उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. उल्लंघन झाल्यास तात्काळ गुन्हे नोंदवावेत अशा सूचना  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान पूर्व 72 तासात करावयाच्या कारवाईच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सर्व निवडणूक निरीक्षक रुही खान, ज्योती मीना, स्वप्नील ममगाई, संतोष कुमार, दुलीचंद राणा, सतीश कुमार, पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांसह वरिष्ठ अधिकारी, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
श्री जावळे यांनी सांगितले की , शेवटचे ७२ तास, ४८ तास या कालावधीत आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आचारसंहिता पालन करावे. यामध्ये कुठलीही हलगर्जी होता कामा नये. कुठेही अनियमितता दिसता कामा नये. स्थिर, फिरत्या पथकांची आवश्यकता वाटल्यास त्यांच्या नेमणुका सुरु ठेवाव्यात.  आचारसंहितेचे उल्लंघन होता कामा नये असे निर्देश त्यांनी बैठकीत दिले.
शेवटच्या कालावधीत प्रचार होत असताना होणारे आचारसंहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी विशेष लक्ष देवून जबाबदारी पार पाडावी. कुठेही  जाहिर प्रचार सुरू राहता कामा नये. भरारी पथकांनी चांगल्या प्रकारे सनियंत्रण करून अशा प्रचारावर बारीक लक्ष ठेवा. स्थिर पथकांनीही चांगल्या प्रकारे ॲक्टीव राहून कामे करावे अशा सूचना जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी दिल्या.
मतदान केंद्राच्या बाहेर २०० मीटर त्रिज्येमध्ये उमेदवारांचे निवडणूक बूथ उभारण्यात येऊ नयेत. एकाच इमारतीत किंवा आवारामध्ये अनेक मतदान केंद्रे असल्यास अशा सर्व मतदान केंद्राकरिता मिळून केवळ एक निवडणूक बूथ प्रत्येक उमेदवाराकरिता २०० मीटर त्रिज्येच्या बाहेर उभारता येईल.  निवडणूक बूथ उभारण्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी, आवश्यकते नुसार शासकीय प्राधिकरणे तसेच स्थानिक प्राधिकरणे यांच्या परवानग्या घेणे आवश्यक राहिल. निवडणूक बूथ उभारल्यामुळे सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेचे अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. बूथ धार्मिक जागेमध्ये किंवा परिसरात उभारण्यात येऊ नये. निवडणूक बूथ शैक्षणिक संस्था किंवा रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येऊ नये. अशा निवडणूक बूथवर पक्षाचा ध्वज आणि पक्षाचे चिन्ह लावता येणार नाही असेही श्री जावळे यांनी यावेळी सांगितले.  निवडणूक बूथवर उपस्थित व्यक्तींकडून मतदानाकरिता येणाऱ्या मतदारांना कोणताही अडथळा किंवा प्रभाव होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. मतदान केंद्रापासून २०० मि. परिसरात कोणताही प्रचार अनुज्ञेय नाही.
यावेळी पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी कायदा व सुव्यावस्थेच्या संदर्भात केलेल्या तयारीचा अहवाल सादर केला.
20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शांतता कालावधी मतदान संपण्यापूर्वी 48 तास म्हणजेच सोमवारी 18 नोव्हेंबर 2024 रोजी  सायंकाळी सहा वाजेपासून सुरू होत आहे. या कालावधीत दृकश्राव्य माध्यमे ( टेलिव्हिजन ,केबल नेटवर्क ,रेडिओ, सोशल मीडिया) यावर शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या तसेच निवडणुकीच्या निकालावर  परिणाम करू शकणाऱ्या बाबी प्रदर्शित करण्यास मनाई आहे.
Share.