दिनांक –२३/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- टीमलीझ सर्व्हिसेस ही भारतातील एक आघाडीची लोक पुरवठा साखळी कंपनी आहे. या कंपनीने टेलिकॉम क्षेत्रावरील आपले अलीकडचे मूल्यांकन प्रकाशित केले आहे, ज्यामध्ये वाढत चाललेल्या ब्रॉडबॅन्ड क्षेत्राची लक्षणीयता स्पष्ट दिसून येते. टेलिकॉम क्षेत्रातील वाढ मंद असली, तरी हाय-स्पीड इंटरनेटची आणि डेटा-चालित सेवांची वाढती मागणी यामुळे ब्रॉडबॅन्ड मार्केटमध्ये येत्या काही वर्षांत ९-१०% कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट दिसण्याची आशा आहे. सध्या भारतात वायर्ड ब्रॉडबॅन्डचा प्रसार सुमारे १३% आहे. प्रति यूझर उच्च सरासरी उत्पन्नामुळे सेवा प्रदाते पारंपरिक मोबिलिटी उत्पादनांपेक्षा ब्रॉडबॅन्ड सेवांना प्राधान्य देत असल्याने हा प्रसार आणखी वाढणे अपेक्षित आहे.
ब्रॉडबॅन्ड सेवांच्या विस्तारामुळे केवळ कनेक्टिव्हिटीच वाढत नाही आहे, तर संपूर्ण दूरसंचार उद्योगात रोजगारास देखील चालना मिळत आहे. ब्रॉडबॅन्ड सेवांचा विस्तार होत जातो तशी वेगवेगळ्या कामांसाठी कुशल व्यावसायिकांची मागणी देखील वाढत जाते. ब्रॉडबॅन्ड सेवांचा विस्तार आजवर अस्पर्श राहिलेल्या प्रदेशात होतो, त्यावेळी ग्राहक मिळवण्यासाठी सेल्स टीम्सची भूमिका महत्त्वाची असते. त्याव्यतिरिक्त, कनेक्शन करून देण्यासाठी आणि सेवा सुरळीतपणे पोहोचवण्यासाठी इंस्टॉलेशन आणि दुरुस्ती टीम्सची देखील गरज असते. या विरुद्ध, नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर सांभाळण्यासाठी आणि ग्राहक साहाय्य प्रदान करण्यासाठी फायबर टेक्निशियन्स, नेटवर्क ऑपरेशन्स सेंटर अधिकारी आणि कस्टमर केअर व्यावसायिक यांच्यासहित नेटवर्क ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स टीम्स देखील महत्त्वपूर्ण असतात. भारतातील फोफावत चाललेल्या ब्रॉडबॅन्ड ईकोसिस्टमच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या नोकऱ्या आवश्यक आहेत.
टेलिकॉम क्षेत्राच्या भविष्याविषयी टिप्पणी करताना टीमलीझ सर्व्हिसेसचे चीफ स्ट्रॅटजी ऑफिसर श्री. सुब्बुरथिनम पी. यांनी या उद्योगाच्या विकासाला चालना देण्यात ब्रॉडबॅन्डचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “ब्रॉडबॅन्ड सेवांचा विस्तार म्हणजे केवळ इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुधारणे नाही, तर आपण ज्या पद्धतीने जगतो, काम करतो आणि जगाशी संवाद साधतो त्यात मोठा बदल घडवून आणणे. सध्या भारतातील घरांमधील ब्रॉडबॅन्डचा प्रसार फक्त १३% आहे पण ५जीचा स्वीकार आणि नजीकच्या भविष्यातील सॅटेलाइट आधारित सेवा पाहता असे म्हणता येईल की आपण लवकरच एका मोठ्या स्थित्यंतराला सामोरे जाणार आहोत. ब्रॉडबॅन्ड मागणीतील ही वाढ सेल्सपासून ते इंस्टॉलेशनपर्यंत आणि नेटवर्क ऑपरेशन्सपासून ते कस्टमर सर्व्हिसपर्यंत रोजगाराच्या नवनवीन संधी उत्पन्न करत आहे. टेलिकॉम क्षेत्रात एक मोठा बदल होताना आपण बघत आहोत, ज्यामध्ये डेटा-प्रेरित सेवा विकासाच्या नवीन लाटेचे नेतृत्व करतील आणि करकीर्दीचे नवीन मार्ग शोधून मनुष्यबळास नवीन आकार देतील.”
नोकऱ्यांसाठीच्या वाढत्या मागणीव्यतिरिक्त, ब्रॉडबॅन्ड सेक्टरच्या भविष्याला आकार देण्यास सक्षम असलेले अनेक मुख्य ट्रेंड देखील डेटा शोधून काढतो. एअर फायबर म्हटल्या जाणाऱ्या ५जी-आधारित वायरलेस ब्रॉडबॅन्ड सेवांचा विस्तार सध्या सुरू आहे. काही सेवा प्रदाते या ऑफरिंग लॉन्च करत आहेत. या घडामोडीमुळे अधिक जलद इंटरनेट स्पीड आणि सुधारित कव्हरेज मिळेल, त्यामुळे हाय-स्पीड डेटाची गरज भागेल. तसेच, निरंतर सुरू असलेल्या भारतनेट प्रकल्पामुळे ग्रामीण कनेक्टिव्हिटी वाढत आहे आणि वंचित भागांना ब्रॉडबॅन्डचा अॅक्सेस मिळत आहे. शिवाय, भारतातील सॅटेलाइट-आधारित इंटरनेट सेवांच्या संभाव्य सुरुवातीमुळे दूरवरच्या भागांत इंटरनेट अॅक्सेस मिळण्याबाबत क्रांतिकारक बदल होईल, ज्यामुळे ब्रॉडबॅन्ड बाजारात स्पर्धा आणखीन वाढेल.
पगारवाढीच्या बाबतीत ब्रॉडबॅन्ड क्षेत्र स्थिर विकास दाखवत आहे. आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या टप्प्यापासून ते आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या टप्प्यापर्यंत सरासरी वेतन ३.१८%नी वाढले आहे. ज्यावरून या क्षेत्रातील कुशल व्यावसायिकांची वाढती मागणी दिसून येते. शिवाय असोसिएट वृद्धी विशेष उल्लेखनीय आहे. आर्थिक वर्ष २०२३ च्या दुसऱ्या टप्प्यापासून ते आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत ८७.७६% वाढ झाली आहे. तसेच आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या टप्प्यापासून ते आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या टप्प्यापर्यंत ही वाढ ४७.१०% आहे. ही लक्षणीय वाढ दर्शविते की ब्रॉडबॅन्ड सेवांचा प्रसार नवनव्या प्रदेशात होत असताना व्यावसायिकांची मागणी वाढत आहे.