दिनांक –०२/०१/२०२५, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- हरिनामाचा जप करीत असताना पांडुरंग उलपे यांना १५ दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. त्यांना तत्काळ दवाखान्यात हलवले. अनेक प्रयत्नांनंतर रात्री अखेर डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे जाहीर केले. घरी अंत्यविधीची तयारी सुरू झाली आणि ॲम्ब्युलन्स मधून त्यांना घरी नेताना रस्त्यात बसलेल्या धक्क्याने त्यांची पुन्हा हालचाल सुरू झाली. त्यांना पुन्हा दवाखान्यात दाखल केले. पंधरा दिवस त्यांच्यावर उपचार झाले. त्यानंतर नव्या दमाने ते पुन्हा सोमवारी घरी परतल्याने देव तारी त्याला कोण मारी” या म्हणीचा प्रत्यय आला आहे.
हा कुठल्या सिनेमातील प्रसंग नाही, तर प्रत्यक्ष उलपे मळा परिसरात घडलेली ही घटना आहे. पांडुरंग रामा उलपे (वय-६५) असे त्यांचे पूर्ण नाव आहे. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच ते वारकरी संप्रदायात आहेत. शेतमजूर म्हणून काम करताना आयुष्याच्या पासष्टीतही ते हरिनामात तल्लीन होतात.
मिळालेल्या माहितीनुसार, ” १६ डिसेंबरला सायंकाळी पांडुरंग उलपे (तात्या) हरिनामाचा जप करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. काही तरी आवाज आल्याची चाहूल लागताच पत्नी बाळाबाई बाहेर आल्या. घामाघूम झालेले तात्या जमिनीवर पडले होते. त्यांनी शेजाऱ्यांना हाक दिली.
तत्काळ गंगावेस येथील एका दवाखान्यात त्यांना आणण्यात आले. रात्री साडे अकरापर्यंत डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते; पण अखेर त्यांनी तात्यांची प्राणज्योत मालवल्याचे जाहीर केले. काही मिनिटांतच ही बातमी कसबा बावडा परिसरात पोचली आणि अंत्यविधीची तयारी सुरू झाली. पै- पाहुणे, परिसरातील नागरिकांसह वारकरीही एकवटले.
दरम्यान, ॲम्ब्युलन्समधून तात्यांना घरी आणताना त्यांची हालचाल होत असल्याचे लक्षात आले. नातेवाइकांनी पुन्हा कदमवाडी येथील दवाखान्यात ॲम्ब्युलन्स नेण्यास सांगितले. तेथे तात्यांवर पुन्हा उपचार सुरू झाले. तात्यांचे शरीर हळूहळू उपचाराला प्रतिसाद देऊ लागले. तात्या शुद्धीवर आले आणि पुन्हा नव्या आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभे राहिले. सोमवारी त्यांचे नव्या दमाने घरी स्वागत झाले. ‘ही सारी पांडुरंगाचीच कृपा…’ असे कुटुंबियांनी म्हंटले आहे.