दिनांक –२६/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानाची अंमलबजावणी या विषयावर स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे (नागरी) 2.0 राज्य अभियान संचालक, नवनाथ वाठ यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करून एक चळवळ उभी केली. देशभरात हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. याच धर्तीवर स्वच्छता हाच आरोग्याचा मंत्र असून मुंबईमध्ये ‘डीप क्लिन ड्राईव्ह’च्या माध्यमातून रस्ते साफ करणे, रस्ते झाडणे, पाण्याने रस्ते धुणे हे काम सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरंभ झालेले हे राज्यस्तरीय अभियान 2 ऑक्टोबर 2024 पर्यंत चालणार असून राज्यातील नागरी व ग्रामीण भागात ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या अभियानाची अंमलबजावणी, वैशिष्ट्ये आणि अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम याबाबत अभियानाचे संचालक श्री. वाठ यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरूवार, दि. 26 व शुक्रवार दि.27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.