दिनांक –१४/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात बाष्पके संचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम या विषयावर बाष्पके संचालनालयाचे सहसंचालक गजानन वानखेडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
महाराष्ट्र हे बाष्पक उत्पादन क्षेत्रात अग्रगण्य राज्य आहे. बाष्पक सयंत्र हे वाफेशी संबंधित आहे. हे ऑईल मिल, वस्त्र उद्योग, रासायनिक उद्योग, पेट्रोकेमिकल्स, रिफायनरिज (कच्चे खनिज तेल), दुग्ध/खादय व्यवसाय, हॉटेल उद्योग, विजनिर्मिती इत्यादीसाठी वापरले जाते. या सर्व उद्योगात बाष्पकांची गरज भासते. बाष्पक हे अत्यंत उपयोगी जरी असले तरी त्याच्या स्फोटकतेमुळे ते धोकादायकही ठरु शकते. यासाठी शासनस्तरावर बाष्पके संचालनालयामार्फत घेतलेले धोरणात्मक निर्णय, बाष्पकांच्या सुरक्षित व प्रभावी वापराकरिता जनजागृती, तसेच बाष्पकं हाताळतांना जिवीत व वित्तहानी होवू नये याकरिताचे प्रयत्न याबाबत सहसंचालक श्री. वानखेडे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार दि. 12 आणि सोमवार दि. 14 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक श्वेता शेलगावकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.