दिनांक –२०/०९/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- कृषी विभागातील विविध योजनांच्या प्रचारासाठी कृषी विभागातील विविध महामंडळाच्या समन्वयाने दि. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त राज्यभर मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

कृषी विभागांतर्गत विविध महामंडळाच्या समन्वयाने तालुक्यात मेळावे आयोजित करण्याबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी श्री.मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, उपसचिव संतोष कराड, उपसचिव प्रतिभा पाटील, दूरदृश्य प्रणालीद्वारे कृषी संचालक विजयकुमार आवटे व विविध महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

कृषी मंत्री श्री. मुंडे म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना विविध माध्यमातून राज्य शासन दरवर्षी किमान 50 हजार रुपये देत आहे तसेच कृषी यांत्रिकीकरणासाठी आणि उत्पादन वाढीसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे. या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी कृषी व पशुसंवर्धन विभागांतर्गत कार्यरत असणारे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य मत्स्योद्योग विकास महामंडळ, आत्मा प्रकल्प, कृषी उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामार्फत मेळावे आयोजित करून प्रत्येक योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात यावी. यासाठी येत्या महात्मा गांधी जयंतीला राज्यातील प्रत्येक तालुकास्तरावर मेळावे आयोजित करण्यात येत असल्याचे श्री. मुंडे यांनी सांगितले.

Share.