दिनांक –०१/१०/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासनाकडून वित्तिय सहाय्य उपलब्ध करुन दिल्यास, काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल, ही बाब विचारात घेवून सन 2024 च्या काजु हंगामासाठी काजू उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वीत केली होती. या योजनेसाठी अर्ज सादर करावयाची मुदत दि.31 ऑक्टोबर 2024 पर्यंत वाढविण्यात आली असून अनुदान योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य काजू मंडळ तथा कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ संजय कदम यांनी केले आहे.
राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासन अनुदान देणे या योजनेची अंमलबजावणी बाबतची प्रक्रिया पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनुदान मागणीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज, संमतीपत्र, 7/12, कृषी खात्याचा दाखला, जी.एस.टी.बील, बँक तपशिल, आधारकार्ड, हमीपत्र इ. कागदपत्रे अनुदान मागणीसाठी आवश्यक आहेत.
अधिक माहीतीसाठी इच्छुक काजू उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे मुख्यालय वेंगुर्ला, तसेच उपविभागिय कार्यालय, शांतीनगर, नाचणे, जि.रत्नागिरी यांच्याशी अथवा श्री.पवन बेर्डे, कृषि व्यवसाय पणन तज्ञ ( 7218350054) यांच्याशी संपर्क साधावा. अर्ज प्राप्त करणे तसेच जमा करण्याची सुविधा कुडाळ सुविधा केंद्र. MIDC कुडाळ, हापुस आंबा निर्यात सुविधा केद्र जामसंडे ता. देवगड या ठिकाणी करण्यात आली आहे.