दिनांक –१९/११/२०२४, मुंबई प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- आसियान इंडिया म्युझिक फेस्टिवल २०२४ या महोत्सवात कला सादरीकरणांचा अफलातून मेळ साधला जाणार आहे. भारतातील आघाडीचे कलावंत आणि प्रतिभावान आसियान बॅण्ड्सची सादरीकरणे होणार आहेत, यातून वैविध्यपूर्ण सांगितिक परंपरांचा अनुभव घेण्याची अनोखी संधी रसिकांना मिळणार आहे.
मोफत प्रवेश असणारा हा महोत्सव २९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजल्यापासून पुराना किल्ला नवी दिल्ली येथे सुरू होणार आहे. भारतातील संगीत क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय गायकांमध्ये गणना होणारे रघू दीक्षित आणि शान पहिल्या दिवशी कला सादर करणार आहेत. ३० नोव्हेंबरलाही हाच उत्साह कायम राखत उत्साहाने सळसळणारा बॅण्ड वेस्टर्न घाट्स आणि जोरदार जोडी सुकृती-प्रकृती यांची सादरीकरणे होणार आहेत. त्यांच्या शैलींमुळे मंचावर सुरांचा सुरेल मेळ साधला जाईल, अशी खात्री सर्वांनाच आहे. १ डिसेंबर रोजी जसलीन रॉयल यांच्या सादरीकरणाने महोत्सवाची शानदार सांगता होणार आहे. जसलीन रॉयल या रसिकांच्या मनाला सुखावणाऱ्या सुरेल गायनासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या आवाजाने जगभरातील संगीत रसिकांची मने जिंकून घेतली आहेत.
भारतीय कलावंतांसोबतच या महोत्सवात आसियान बॅण्ड्सची लक्षणीय मेजवानी आहे. त्यामुळे रसिकांना आसियान प्रदेशातील समृद्ध व वैविध्यपूर्ण सांगितिक परंपरा अनुभवण्याची संधी मिळणार आहे. या वर्षीच्या महोत्सवात थायलंडचा टेलीव्हिजन ऑफ, व्हिएत नामचा ब्युक तुओंग, मलेशियाचा फ्लोअर एटीएट, सिंगापोरचा सबसॉनिक आय, कंबोडियाचा चेत कान्हच्ना, म्यानमारचा एमआरटीव्ही आणि फिलिपिन्सचा काइया या बॅण्ड्सोबत आणखीही काही बॅण्ड्स कला सादर करणार आहेत. या सादरीकरणांमधून प्रदेशातील सांगितिक वैविध्य तर सर्वांपुढे येईलच, शिवाय भारत व आसियानमधील वाढते सांस्कृतिक संबंधही अधिक दृढ होतील.
आसियान-इंडिया म्युझिक फेस्टिवल हा केवळ संगीताचा उत्सव नाही; हे आसियान-भारत यांच्यातील सर्वसमावेशक धोरणी सहयोगातील सखोल सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक आहे. सांस्कृतिक आदानप्रदानाचा एक चैतन्यपूर्ण मंच म्हणून, हा महोत्सव भारताच्या ‘अॅक्ट इस्ट पॉलिसी’ची दशकपूर्तीही साजरी करत आहे. या कार्यक्रमाला भारत सरकारमधील परराष्ट्र व्यवहार मंत्री श्री. एस. जयशंकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि आसियानच्या सर्व १० सदस्य राष्ट्रांचे हेड ऑफ मिशन्सही कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
सेहेरचे संस्थापक संचालक संजीव भार्गव यांनी आगामी महोत्सवाबद्दल त्यांचे विचार व्यक्त केले. ते म्हणाले, “संगीत हे केवळ सादरीकरणाहून खूप अधिक असे काही आहे- आपला सामाईक मानवतावाद, आपल्या आशा, आपली स्वप्ने यांची ती अभिव्यक्ती आहे. आपल्या पार्श्वभूमी वेगवेगळ्या असल्या तरी संगीतात आपल्याला एकत्र आणण्याची शक्ती आहे याचीच आठवण आसियान इंडिया म्युझिक फेस्टिवल सुंदर पद्धतीने करून देतो. हा महोत्सव आपल्याला केवळ कलावंत म्हणून नव्हे तर खूप मोठ्या जागतिक समुदायाचा भाग असलेल्या व्यक्ती म्हणून जोडून घेण्याची मुभा देतो. हा महोत्सव केवळ प्रतिभेचे प्रदर्शन नाही, तर अनेक वर्षांपासून आपण जे बंध निर्माण केले आहेत त्यांचा तसेच सुरांच्या वैश्विक भाषेच्या माध्यमातून आपण जे नवीन बंध निर्माण करत आहोत त्यांचा हा उत्सव आहे. आपल्याला एकमेकांपासून वेगळे करणाऱ्या या प्रदेशातील सीमा आणि हद्दी आपण विसरून जाऊ आणि संगीताच्या या मंचावर एकत्र येऊन आपल्यातील समान दुवे सादर करू.”