दिनांक – ०६/०१/२०२६, छत्रपती संभाजीनगर / वैजापूर: प्रतिनिधी, गर्जा महाराष्ट्र न्यूज:- तालुक्यातील बळ्हेगाव येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून एका पोलीस कॉन्स्टेबलची निर्घृण हत्या करण्यात आली असून, आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेजारच्याच पडक्या घरात गाडून ठेवला होता. नानासाहेब रामजी दिवेकर (वय ५२) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, या घटनेने पोलीस दलासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय? नानासाहेब दिवेकर हे देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, ते १ जानेवारीपासून बेपत्ता होते. या संदर्भात त्यांचे नातेवाईक आणि मुलगा यांनी शोधाशोध सुरू केली असता, त्यांचा फोन लागत नसल्याने त्यांनी शिऊर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे बळ्हेगाव येथील त्यांच्या घराची झडती घेतली असता, त्यांचा मोबाईल घरातच पलंगाखाली आढळून आला. यामुळे पोलिसांचा संशय बळावला.पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता, घराशेजारील एका पडक्या घरात आणि पत्राच्या शेडमध्ये जमीन उकरल्यासारखी (ताजी माती) दिसली. पोलिसांनी नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी खोदाई केली असता, नानासाहेब दिवेकर यांचा मृतदेह जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळून आला.

भाऊच निघाला मारेकरी: या प्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवत नानासाहेब यांचा लहान भाऊ ‘लहानु रामजी दिवेकर’ याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीला संशय होता की नानासाहेब यांचे त्याच्या पत्नीशी (भावजयीशी) अनैतिक संबंध आहेत. याच रागातून, २ जानेवारीच्या रात्री नानासाहेब झोपेत असताना आरोपीने त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने (कोयत्याने) वार करून त्यांची हत्या केली आणि मृतदेह शेजारील पडक्या घरात खड्डा खोदून पुरला.
तपास सुरू: या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला असून, शिऊर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सख्ख्या भावानेच भावाचा काटा काढल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share.